पुणे,दि.२१: जेव्हा कधी माझ्या महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात येईल तेव्हा शहराचं नियोजन करण्यासाठी प्लॅनिंग आर्किटेक्टच्या हाती देईन हा माझा शब्द आहे असं राज ठाकरे यांनी पुण्यात एका मुलाखतीत म्हटलं आहे. जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास ह्यावर विषयावर ज्येष्ठ लेखक दीपक करंजीकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून अनेक गोष्टींवर भाष्य केले.
या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले की, आजही मुंबई दर्शन घडवायचे झाले तर त्यात ब्रिटीश कालीन वास्तू दाखवल्या जातात. शहर रचना हे रॉकेट सायन्स नाही, किती लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येला लागणाऱ्या गोष्टी कोणत्या, शाळा, मार्केट, हॉस्पिटल, रस्ते हे सांगावे लागतात. परळमध्ये हॉस्पिटलचा हब ब्रिटिशांनी बनवला. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत असा कुठलाही हब बनला नाही. आता अनेक गोष्टी खासगीकरण केले जाते हे चिंताजनक आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मी जेव्हा बाळासाहेबांची फोटोग्राफी तयार करत होतो, तेव्हा गेट ऑफ इंडियासमोर सर्व जनता बसली होती. अटलबिहारी वाजपेयी तिथे होते, त्यांच्या सुरक्षेसाठी एक अधिकारी आले. त्यांनी विचारले हे काय आहे तर मी म्हटलं ताज हॉटेल आहे. ते म्हणाले हे कपड्याने झाका, मी म्हटलं माझ्या बापाची मिल आहे. हा विचार त्यांच्या डोक्यात आला हा महत्त्वाचा आहे. ताजसारखी बिल्डिंग झाकण्याचा विचार येणे महत्त्वाचे आहे असा किस्सा राज यांनी मुलाखतीत सांगितला. समाजाचा नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याशी संपर्क येतो कधी? किती वेळा भेटतात? छोटीमोठी कामे असली तर भेटतात. नाहीतर रोज सकाळी बॅग उचलून कामावर जायचे घरी यायचे, या लोकांना समाधान लागते. खासदार, आमदार, नगरसेवकांची कामे लोकांना माहिती नाहीत अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
दरम्यान, शहरांमध्ये दिवे लावले त्याला सौंदर्य म्हणतात का? वीजेच्या पोलवर लायटिंग केली म्हणजे सुंदर शहर झाले असं होत नाही. लोकसंख्येनुसार १५ टक्के रस्ते लागतात. पुण्यात ७ ते ८ टक्के रस्ते आहेत. एकेदिवशी घरातून निघाल तर तिथेच फसाल. १ इमारत वाढली, तर त्यात किती गाड्या, माणसे येणार, मित्र परिवार येणार हे सगळे किती मावणार कसे याचा विचार न करता एफएसआय दिला जातो. स्विमिंग पूल महापालिकेने लोकांना द्यायचा आज तीच गोष्ट बिल्डर लोकांना देतायेत आणि त्यातून पैसे कमावतात. मग प्रशासन केवळ परवानगी देण्यासाठी आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी केला.