मनसेने लाऊडस्पीकर वादावरून पोलीस आयुक्तांकडे केली ही मागणी

0

पुणे,दि.7: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लाऊडस्पीकर काढण्याची मागणी केल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता चक्क पोलिसांना मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत पक्षाने पुणे पोलिस आयुक्तांना मनसेने पत्र पाठवले असून, यामध्ये मशिदींतील लाउडस्पीकर काढल्यानंतर ते रस्त्यावर ठेवा. तसेच मौलानांचे संमतीपत्र घ्या. अन्यथा पोलिस ठाण्यासमोर हनुमान चालिसा वाजवून निषेध नोंदवू, असे म्हटले आहे.

मनसेचे पत्र

पुणे मनसेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘लाउडस्पीकर ही सामाजिक समस्या आहे आणि आम्हाला धार्मिक तेढ निर्माण करायची नाही. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. संपूर्ण पुणे शहरात सुमारे 400 ते 450 मशिदी आहेत. जवळपास सर्वच मशिदींमध्ये लाऊडस्पीकर आहेत. ते अनधिकृत आहेत. लाउडस्पीकर कायमचे काढून टाकावेत किंवा बंद करावेत जेणेकरुन आजूबाजूला राहणार्‍या नागरिकांना त्यातून निघणाऱ्या मोठ्या आवाजाचा त्रास होऊ नये, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.

मनसेने पुढे म्हटले की, ‘आम्ही अजानच्या विरोधात नाही, पण आम्हाला एवढेच सांगायचे आहे की, लाउडस्पीकरवरून असे करू नये. या सर्व मशिदींच्या मौलवींशी बोलून लेखी अहवाल पोलिसांनी आम्हाला द्यावा. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याचीही पोलिसांनी दक्षता घ्यावी. मशिदींमधून लाउडस्पीकरवर अजान वाजवली जाणार नाही, असा संदेश या अहवालातून निघायला हवा, असे आवाहनही केले आहे.

राज ठाकरेंनीही केली होती अशीच मागणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्राद्वारे म्हटले होते की, मशिदींवरून लाउडस्पीकर हटवल्यास धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही आणि मौलवी आपल्यासोबत कायद्याचे पालन करतील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here