मुंबई,दि.९: ठाकरे गटाचेच आमदार अपात्र होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. दैनिक लोकमतशी बोलताना संजय शिरसाट यांनी निकाल त्यांच्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्र प्रकरणावर उद्या (दि.१०) निकाल देणार आहेत. राहुल नार्वेकर यांच्यावर अनेकदा पक्षपातीपणा केल्याचे आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आले आहेत.
या निकालाकडे संपूर्ण देशाची लक्ष लागले आहे. असे असले तरी या निकालाबाबत आमच्या मनात कोणतीही धाकधूक नाही, कारण आम्ही काही पक्षांतर केले नाही. यामुळे पक्षांतर बंदीचा कायदा आम्हाला लागू होत नाही, यामुळे हा निकाल आमच्या बाजूनेच लागेल असा विश्वास शिंदे गटाचे (शिवसेना) प्रवक्ते आमदार संजय सिरसाट यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरतील
आम्ही सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यामुळे विधानसभा अध्यक्ष निकाल काय देतील याविषयी आम्हाला चिंता नाही अथवा धाकधुक नाही. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष खरा असल्याचे स्पष्ट केले आहे . पक्षांतर बंदी कायदाचे शेड्युल दहा आम्हाला लागू होत नाही, कारण आम्ही पक्षांतर केले नाही. यामुळे हा निकाल आमच्या बाजूनेच लागेल अशी आम्हाला खात्री आहे. आणि या निकालानुसार ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरतील असेही त्यांनी स्पष्ट केले.