कोल्हापूर,दि.29: अजित पवार गटाचे आमदार घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार गटात येण्यास अजित पवार गटाचे आमदार तयारी करत असल्याची चर्चा होती. अशातच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडली. अजित पवार गटाच्या पाच ते सहा आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.
विधानभवनातच्या एका खोलीत ही भेट झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी आमदारांना घरवापसीचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागली. आता याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांना शनिवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार गटातील आमदार परतीच्या वाटेवर आहेत का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षातील इतर प्रमुख नेत्यांना याबाबत माहिती असेल. या संदर्भात माझी कोणाशी प्रत्यक्ष भेट झालेली नाही.
अजित पवार गटाचे आमदार परत आले तर त्यांचे पक्षात स्वागत असेल का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, कोण कोण येतंय ते बघुया. तुमच्याकडे काही नावे आहेत का? असा प्रतिप्रश्नही पवारांनी केला. तसेच आधी प्रस्ताव येऊ द्या. माझ्यासमोर तसा प्रस्ताव आलेला नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर तसा काही प्रस्ताव असेल तर मी यावर तुर्तास भाष्य करणार नाही, असेही पवार म्हणाले.