आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख आक्रमक दिला इशारा 

0
आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख

सोलापूर,दि.२७: भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख (MLA Vijaykumar Deshmukh) आणि आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh) या दोन्ही आमदारांनी आक्रमक भूमिका घेत पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही आमदार अस्वस्थ झाले आहेत. दोन्ही देशमुख भाजपात होणाऱ्या प्रवेशाबाबत नाराज आहेत. कार्यकर्त्यांनीही याअगोदरच इतर पक्षातील नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जाऊ नये अशी भूमिका घेतली होती. मात्र कार्यकर्त्यांना न जुमानता अनेकांना पक्षात प्रवेश दिला आहे. निष्ठांवत कार्यकर्त्यांना यामुळे त्रास होत आहे. कार्यकर्त्यांनी किती वर्षे फक्त सतरंज्या उचलण्याचे काम करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख आक्रमक दिला इशारा 

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील विकोपाला गेलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असून, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या वक्तव्यांतून पक्षातील अस्वस्थता, निर्णयप्रक्रियेतील संभ्रम आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भवितव्याबाबतची चिंता समोर आली आहे. उमेदवारी देताना निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय झाला आणि तो कार्यकर्ता इतर पक्षाकडून उभा राहिला तर आपण त्यांच्या पाठीशी राहू असे  विजयकुमार देशमुख यांनी म्हटले आहे. तर पक्षाने भूमिका बदलल्यास आपणही बदलू असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी दिला आहे.

निवडणूक समितीत नेमके कोण सदस्य आहेत?

या दोन्ही आमदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमांशी बोलताना निष्ठावंत कार्यकर्ता हा समान धागा अधोरेखित केला आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनी सध्याच्या निवडणूक यंत्रणेबाबत उघडपणे प्रश्न उपस्थित केले. निवडणूक समितीत नेमके कोण सदस्य आहेत, कोण निर्णय घेत आहे, हेच स्पष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले. समिती जाहीर झाली तेव्हा रघुनाथ कुलकर्णी यांचा समावेश होता, मात्र नंतर त्यांची भूमिका दिसून न आल्याने संभ्रम वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यकर्ता अन्य पक्षातून उभा राहिला तर…

वाटाघाटी नेमक्या कोणासोबत करायच्या, हे स्पष्ट नसल्यामुळे आपण कोणाशीही संपर्क साधलेला नसल्याचे सांगत, सध्याच्या परिस्थितीत पालकमंत्र्यांकडेच सर्व अधिकार केंद्रित झाल्याचे चित्र असल्याची सूचक टिप्पणी त्यांनी केली. गेली पाच टर्मपासून आपल्या सोबत उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार विजयकुमार देशमुख यांनी मांडली. निष्ठावंत कार्यकर्ता अन्य पक्षातून उभा राहिला तर त्याचा प्रचार करण्याची तयारी आमदार देशमुख यांनी जाहीर केली.

काही जणांचे भाजपमध्ये प्रवेश झाले आहेत पक्षात प्रवेश करतानाच ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, हे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट सांगितले होते, जर पक्षाने त्या भूमिकेत बदल केला, तर आम्हालाही आपली भूमिका बदलावी लागेल, असा थेट इशारा आमदार सुभाष देशमुख दिला.

पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत असे सुभाष देशमुख म्हणाले. या निवडणुकीत उमेदवार किती खर्च करणार किंवा त्याची किती क्षमता आहे याबाबत मुलाखतीतून विचारणा होते याचं आश्चर्य वाटतं असल्याचे मत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. भाजपमध्ये अशा पद्धतीने किती खर्च करणार हे विचारण्याची पद्धत नव्हती आणि नाही असे देशमुख म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here