Sanjay Shirsat: आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

0

औरंगाबाद,दि.18: औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांना उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संजय शिरसाठ यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. शिरसाट यांना आता पुढील उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात येणार आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिरसाट यांना मागील दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यातच त्यांनी सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडात त्यांचा सहभाग होता. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांचा समावेश होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर संजय शिरसाट यांनी शिवसेना नेतृत्वावर विशेषत: खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती.

संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम येथील आमदार आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरात शिरसाटदेखील सामील होते. शिवसेनेचे उमेदवार म्हणून सलग तीन वेळेस विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचा 40 हजार 747 मतांनी पराभव केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here