एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचं मोठं विधानं

0

यवतमाळ,दि.६: एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मोठं विधानं केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्याबरोबर शिवसेनेचे अनेक आमदार गेले. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना परत येण्याचे भावनिक आवाहन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असे खळबळजनक विधान शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर प्रथमच यवतमाळला आलेल्या आमदार संजय राठोड यांनी केले.

पक्षातील उठावानंतर सर्वांचाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मातोश्री’वर परत येण्याचा विचार सुरू असताना, काही व्यक्तींच्या अनावश्यक बडबडीमुळे ते शक्य झाले नाही, असा आरोपही खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता राठोड यांनी केला.

शिवसेनेत बंड करून शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर येथील दिग्रसचे आमदार संजय राठोड यांचे आज प्रथमच यवतमाळ येथे आगमन झाले. “आम्ही आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत. मात्र मविआत शिवसेनेवर कायम अन्याय झाला. शिंदे गटात गेलेल्या अनेक मंत्री, आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेतील व पक्षातील गळचेपीबद्दल वारंवार सांगूनही आमच्या समस्यांकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे आत्मसन्मानार्थ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वासाठी व लोकहिताची कामे करण्यासाठी आम्हाला बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता,” असे राठोड म्हणाले.

पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गटात गेलेल्या संजय राठोड यांच्या विरोधात कालपर्यंत घोषणाबाजी करणारे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही आज राठोड यांच्या स्वागतासाठी पुढाकार घेतला होता. दरम्यान संजय राठोड यांनी मातोश्रीवर परत जाण्यासंबंधी विधान केल्याने चर्चा रंगली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here