दि.८: भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्यानंतर फोटो पोस्ट करून त्यांनी उद्धव ठाकरेंना माफिया मुख्यमंत्री म्हटले. यावर शिंदे गटाने जोरदार आक्षेप नोंदविला आहे. ठाकरे परिवारावरील टीका आम्ही खपवून घेणार नाही, हे किरीट सोमय्यांनी लक्षात घ्यावे. अन्यथा आम्हाला सत्तेचीदेखील पर्वा राहणार नाही, असा इशारा शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.
माजी खासदार व भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करताना सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यावरून शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, याच प्रकारावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा Shivsena Controversy: छगन भुजबळांचे शिवसेनेतील वादावर भावनिक वक्तव्य
संजय गायकवाड म्हणाले की, “किरीट सोमय्यांनी असे समजायला नको की हे लोक शिवसेनेपासून वेगळे झाले आहेत किंवा वेगळा गट निर्माण केला आहे. आम्ही शिवसेनाच आहोत. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविषयी आमची निष्ठा संपली व त्यांना शिव्या-शाप देऊन आम्ही बाहेर पडू असा अर्थ त्यांनी मूळीच लावू नये”.
“भाजपा-सेना म्हणून सरकार असतांना यापुढे त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करू नये. नाही तर आम्हाला सत्तेची पर्वा राहणार नाही,” असंही ते म्हणाले आहेत.