सोलापूर,दि.7: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर यांचे अध्यासन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त होऊन 2019-20 पासून सदरील अध्यासन केंद्र सुरु करण्यास मंजुरी मिळाली होती. मात्र अद्याप याकरिता आवश्यक निधी अथवा इतर बाबींची पूर्तता शासनाकडून झाली नाही. म्हणून अध्यासन केंद्र स्थापन झाले नाही. तरी आपण विदयापीठाच्या विकासाच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रास निधी मंजूर करावे अशी मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी (MLA Sachin Kalyanshetti) यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री डॉ उदय सामंत (Uday Samant) यांच्याकडे भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विट्यापीठाची स्थापना 2004 साली केवळ एका जिल्हासाठी झालेली असून आज या विद्यापीठास 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. या विदयापीठात जिल्ह्यातील 110 महाविद्यालये संलग्नित असून 1,10,000 विद्यार्थी विदयापीठांतर्गत शिक्षण घेत आहेत, विद्यापीठ कॅम्पसमध्ये एकुण 11 संकुलांतर्गत 30 विभाग कार्यरत असून अभ्यासक्रमांची संख्या 45 इतकी आहे.
विदयापीठाच्या कौशल्य विकास केंद्राकडून एकुण 114 रोजगाराभिमुख नाविन्यपूर्ण कौशल्य कोर्सस सध्या सुरु आहेत. 2004 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे कामकाज पूर्वीच्या शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर केंद्रातील ग्रंथालय इमारतीत सुरु आहे. विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारत व परीक्षा भवनासाठी राज्य शासनाकडे सातत्याने निधीची मागणी केली जात आहे, मात्र या नव्या विदयापीठास 17 वर्षानंतरही निधी प्राप्त झालेला नाही.
नवीन इमारतीसाठी 50 कोटी 19 लाख 25 हजार 453 रुपये निधीची मागणी व प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप तो मंजूर झालेला नाही. याबाबत लवकरात लवकर निधी देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येत असलेला अडथळा दूर करावा जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करण्यात आली आहे.