सोलापूर,दि.7: MLA Rajendra Raut On Manoj Jarange Patil: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांतून प्रेरणा घेत वयाच्या 16 वर्षांपासून मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी काम करत आहे. छत्रपती शिवरायांचा मीही एक मावळा आहे. मराठा समाजासाठी तसेच आरक्षणाच्या चळवळीसाठी होता होईल तेवढे योगदान देत आलो आहे, असे सांगत तुम्ही मात्र राज्यातील मराठे आमदारांना टार्गेट करत सरकार पाडण्याची भाषा करत आहात, असे असेल तर मग तुम्हाला निवडून कोणाला द्यायचे आहे, असा सवाल करत मनोज जरांगे पाटील तुम्ही एकटेच मराठा समाजाचे मालक नाहीत, अशी आक्रमक भूमिका आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेतली.
सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी गेवराई व मांजलगाव येथील जाहीर सभेत आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली. या टीकेनंतर आमदार राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतला. मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतीची भूमिका लिहून घ्या, देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी, त्यांनी लिहून दिलं नाही तर आमदार राजेंद्र राऊत राजकीय संन्यास जाहीर करेल’, असं आव्हान राऊत यांनी जरांगे पाटील यांना दिले होते.
तर राजा राऊताशी गाठ असेल
छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाशी मी गद्दारी केली असेल राजकीय सन्यासच नव्हे तर पांडे चौकात फाशी घेऊ. बार्शीचे मराठा आंदोलन करणारे कार्यकर्ते आण्णा शिंदे यांनी मराठा आंदोलन जरांगे-पाटील यांना 11 प्रश्न विचारले आहेत, या प्रश्नांची उत्तरे जरांगे-पाटील यांनी बार्शीत येऊन सन्मानपूर्वक द्यावीत, पण खंडोजी खोपडेंचे ऐकूण जर बार्शीत पाऊल ठेवाल तर राजा राऊताशी गाठ असेल, असेही आमदार राऊत म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी चॅलेंज स्विकारलं
मनोज जरांगे पाटील यांनी आज भाजपा आमदार राजेंद्र राऊत यांना प्रत्युत्तर दिले. जरांगे पाटील म्हणाले, ‘ मी तुमचं चॅलेंज स्विकारलं आहे, तुम्ही देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडून लिहून घ्यायचं. तुम्ही लिहून आणलेला कागद मी मराठ्यांना देतो. मग मराठे महाविकास आघाडीकडून लिहून आणतील नाहीतर त्यांना पाडतील’,असं प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी दिले.
मनोज जरांगे म्हणाले, “सरकारने मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण दिल्यास आम्ही राजकारणात सहभागी होणार नाही. परंतु जर आरक्षण दिले नाही, तर आम्हाला पुढील पाऊले उचलावी लागतील.” या इशाऱ्यानंतर त्यांनी मराठा समाजाला एकजुटीचे आवाहन केले.