मुंबई,दि.२१: शिवसेना बंड: बंडादरम्यानच पळून आलेले आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी घटनाक्रम सांगितला आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार आहे. शिवसेनेचे विधानसभेतील ४० आमदार, १३ खासदार सध्या शिंदेंबरोबर आहेत. शिवाय शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्हही शिंदे गटाला दिलं. मात्र, अजूनही शिवसेनेतील त्या सर्वात मोठ्या बंडाबाबत निरनिराळे दावे केले जात आहेत. यासंदर्भात शिवसेनेच्या पॉडकास्टमध्ये बंडादरम्यानच तिथून पळून आलेले आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या पलायनाचा घटनाक्रम सांगितला आहे.
बंडाचं नियोजन त्याआधीही झाले होते | शिवसेना बंड
नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) सध्या उद्धव ठाकरेंबरोबर राहिलेल्या आमदारांपैकी एक आहेत. शिंदेंच्या बंडावेळी तेही शिंदेंबरोबर सुरत आणि मग गुवाहाटीला गेले होते. मात्र, तिथून ते माघारी फिरले होते. मात्र, हे बंडाचं नियोजन त्याहीआधी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यादरम्यानच करायचं होतं, असा दावा त्यांनी केला आहे.
“आदित्य ठाकरे अयोध्येला रामाच्या दर्शनाला जाणार होते तेव्हाच यांचं ठरलं होतं की तिथे आमदार बोलवून तिथेच ठेवायचे. त्यावेळी मला थोडी कुणकुण लागली. एका आमदारानं माझे तिकीटंही काढले होते. पण अचानक असं कळलं की तो दौरा रद्द झाला आहे”, असं देशमुख म्हणाले.
त्या ४ दिवसांमध्ये काय घडलं?
“त्या दिवशी विधानपरिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे मला म्हणाले चल बंगल्यावर जाऊ. तेव्हा मी आणि कोल्हापूरचे आमदार आबिटकर त्यांच्या बंगल्यावर त्यांच्याबरोबर गेलो. मग तिथे संतोष बांगर आणि संजय राठोड आले. त्यांनीही काय घडतंय काही माहिती नाही असं सांगितलं. ते थोड्या वेळाने तिथून गेले. मग एकनाथ शिंदेंनी आम्हाला दोघांना गाडीत बसवलं आणि म्हणाले ठाण्याला जाऊन येऊ. पण आम्ही ठाण्याऐवजी पुढे पालघरला गेलो”, असं नितीन देशमुख म्हणाले.
“पालघरमध्ये एका हॉटेलवर मी आणि एकनाथ शिंदे उतरलो. तिथे अचानक दोन-तीन मंत्र्यांच्या गाड्या आल्या. अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, शंभूराज देसाईंची गाडी आली. मला थोडी कुणकुण लागली. तिथल्या पानटपरीवाल्याला मी तो रस्ता कुठे जातो ते विचारलं. तर तो म्हणाला हा रस्ता सूरतला जातो. तिथून १०० किलोमीटर सूरत होतं. त्यानंतर आबिटकरांना त्यांनी दुसऱ्या गाडीत बसवलं. मी, एकनाथ शिंदे, त्यांचा पीए प्रभाकर, संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार असे आम्ही शिंदेंच्या गाडीत बसलो. मग त्यांची गाडीतून फोनाफोनी सुरू झाली. तेव्हा माझी खात्री पटली की काहीतरी गडबड आहे”, असं देशमुख म्हणाले.
बायकोचं नाव सांगून सावंत साहेबांशी…
“मी माझ्या पीएला मेसेज टाकला की असं काहीतरी घडतंय, तू सावंत साहेबांशी बोलून घे. मी सावंत साहेबांना गाडीतून फोन लावला. गाडीतल्या इतरांना कळू नये, म्हणून मी माझी बायको प्रांजलीशी बोलतोय असं नाटक करून सावंत साहेबांना फोन केला. मी म्हटलं मी सूरतला चाललो, शिंदे साहेब सोबत आहेत. दोन मंत्री बसलेत, सरकार पाडायचं वगैरे चाललंय असं सांगितलं. सावंत साहेब मला म्हणाले तू लगेच उतर गाडीतून. पण मला एकदम गाडीतून उतरता येत नव्हतं. मी म्हटलं सूरतला जाऊन पाहू आपण कोण कोण येतंय. तिथून हवंतर आपण परत येऊ”, असं ते म्हणाले.
“मध्ये एका नाक्यावर समोरच्या गाडीतून एक माणूस पळत आला आणि शिंदेंना सांगितलं की कैलास पाटील पळून गेले. मी म्हटलं, चला एक आमदार गेला. सूरतला हॉटेलवर गेलो, तेव्हा तिथे पोलीस बंदोबस्त होता. तिथे किमान १० आयपीएस अधिकारी असतील. त्या हॉटेलला पोलिसांचा घेराव होता. याचा अर्थ, हे सगळं पूर्वनियोजितच होतं”, असा दावा नितीन देशमुखांनी केला.
माझ्या मागे पोलीस धावत होते
“मी शिंदेंना बाजूला नेऊन सांगितलं की हे मला पटत नाहीये. तुम्ही मातोश्रीवर चला आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करा. मी काही इथे थांबणार नाही. ते म्हणाले तुला मी एवढं सहकार्य केलं, तू असं कसं करतोय? मी म्हटलं मेलो तरी इथे थांबत नाही. पण मला बाहेरून पोलीस बाहेर जाऊ देत नव्हते. मग शिंदे साहेब माझ्याबरोबर पुढच्या चौकापर्यंत आले. तिथून मी रस्त्याने पळत निघालो. माझ्यामागे पोलीस होते”, असा गंभीर दावा देशमुखांनी केला.
विमानात मोहित कंबोजही होते
“तिथून आम्ही गुवाहाटीला गेलो. मी सावंतांना फोन लावला, उद्धव ठाकरेंना फोन केला. मग त्यांनी गुवाहाटीला चार्टर्ड प्लेन पाठवलं. मग मी गुवाहाटीला उतरल्यावर हॉटेलला गेलोच नाही. सुरतहून निघालेल्या आमदारांच्या विमानात मोहित कंबोजही होते. मी गुवाहाटी विमानतळावरूनच परतलो. नागपूरला उतरल्यावर माझं जंगी स्वागत झालं”, अशी आठवण नितीन देशमुखांनी यावेळी सांगितली.