नवाब मलिकांचा बार फुसका, भाजपावर आरोप करणारे तोंडघशी : आमदार निरंजन डावखरे

0

ठाणे,दि.३०: राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी किरण गोसावी हा भाजपा आमदाराच्या पत्नीच्या कंपनीत संचालक असल्याबद्दल केलेला आरोपाचा बार फुसका ठरला आहे. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज `मायक्रोबायॉलॉजिस्ट’ असलेल्या किरण गोसावींना आज पत्रकार परिषदेत समोर आणले. अन्, नवाब मलिक तोंडघशी पडले.

भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्या पत्नी निलिमा डावखरे आणि किरण गोसावी एका कंपनीत संचालक असल्याचे स्नॅप शॉट्स काल समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले होते. मंत्री नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर दहा-पंधरा मिनिटांनंतर स्नॅप शॉट्स व्हायरल झाले. त्यामुळे भाजपाविरोधात ब्रह्रास्त्र सापडल्याच्या आनंदात व आर्यन खानच्या माध्यमातून स्वत:चा पर्सनल अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करणारे तोंडघशी पडले आहेत, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

या प्रकाराने खोदा पहाड निकला चुहा' अशी स्थिती निर्माण झाली. मित्र परिवाराने आणलेला गांजा पिऊन व खोटी माहिती देऊन कोणीही दिशाभूल करू नये, असा टोला आमदार डावखरे यांनी मारला.ट्र्यू पॅथलॅब’चे संचालक असलेल्या किरण प्रकाश गोसावी यांचे नामसाधर्म्य आढळल्यानंतर टणाटणा उड्या मारून बदनामी करण्याचा डाव शिजला, असा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला. केवळ ४००-४५० रुपये भरून सविस्तर माहिती घेण्याऐवजी शहानिशा न करता हेतुपुरस्सर आरोप करण्यात आले, असे डावखरे यांनी सांगितले.
मंत्री नवाब मलिक यांनी दीड महिन्यानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात गौप्यस्फोट करण्याचे जाहीर केले.

मात्र, हिवाळी अधिवेशनात राज्यातील शेतकरी, पूर परिस्थिती, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतची चर्चा टाळण्याबरोबरच विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आमदार डावखरे यांनी केला. दरम्यान, गेल्या ७ ऑक्टोबर रोजी पुणे पोलिसांकडून माझ्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांना मी माझी कागदपत्रे व पासपोर्ट दाखविला. केवळ नावात सारखेपणा असल्यामुळे मला नाहक त्रास झाला, असे ट्र्यू पॅथलॅबचे संचालक किरण गोसावी यांनी सांगितले.

पोलिसात तक्रार करणार
समाजमाध्यमांमध्ये `स्नॅप शॉट्स’ व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

'तो मी नव्हेच' म्हणण्याची आली वेळ! आर्यन खान प्रकरणात किरण गोसावीच्या नावाची चर्चा सुरू झाल्यावर, ट्र्यू पॅथ लॅबचे संचालक किरण गोसावी यांना नातेवाईक, मित्र परिवार आणि व्यावसायिक वर्तुळातून विचारणा झाली.तो मी नव्हेच’ असे म्हणण्याची त्यांच्यावर वेळ आली होती. ७ ऑक्टोबर रोजी पोलिसांकडून विचारणा झाली होती. त्यानंतर काल शुक्रवारीही पुणे पोलिसांनी ठाण्यात येऊन कागदपत्रांची माहिती घेतली, अशी व्यथा किरण गोसावी यांनी मांडली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here