Bachchu Kadu: आमदार बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0

मुंबई,दि.१४: आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (MLA Bachchu Kadu remanded to 14 days judicial custody) बच्चू कडू यांना गिरगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २०१८ मध्ये एका आंदोलनादरम्यान सरकारी कामांत अडथळा आणल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर ते आज न्यायालयात हजर झाले होते. याप्रकरणी आज सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बच्चू कडू यांना आज न्यायालयात हजर केलं असता, त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने बच्चू कडू यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?

२०१८ सालच्या एका राजकीय आंदोलनादरम्यान अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. यानंतर मंत्रालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा सरकारी अधिकारी संघटनेने दिला होता.

मात्र, आपण संबंधित अधिकाऱ्यास मारहाण केली नसल्याचा दावा कडू यांच्याकडून करण्यात आला होता. पण सरकारी अधिकारी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतल्याने मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने अलीकडेच बच्चू कडू यांना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला होता. त्यानंतर बच्चू कडू आज न्यायालयात हजर झाले, त्यांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here