मुंबई,दि.१५ः एमआयएमचे अकबरूद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादला आल्यानंतर औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले होते. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. औरंगजेब हा काही साधू-संत नव्हता. महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्याच्या कबरीवर तुम्ही दर्शनासाठी जात असेल तर एक दिवस तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल इतकं लक्षात ठेवा, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली होती.
राज्यातील विविध नेते यावरुन टीका करत आहे. यावरुन आता बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
रवीना टंडन लेखर आनंद रंगनाथन यांचे ट्वीट शेअर करत म्हणाली की, “आम्ही सहनशील आहोत, होतो आणि राहू. भारत हा एक स्वतंत्र देश आहे, इथे कोणालाही कोणाचीही पूजा करता येते. इथे सर्वांना समान अधिकार आहेत.”
रवीना टंडनच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील ट्विटरद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे. अहो टंडनताई औरंग्याच्या थडग्याचा इतिहास जरा वाचून घ्या! अनेक वर्ष हा महाराष्ट्र अशा क्रूरकर्मा औरंगजेबाविरुद्ध लढत राहिला आणि त्याला याच मातीत गाडून शांत झाला. त्या औरंग्याच्या थडग्यावर नतमस्तक होणारी व त्याचं समर्थन करणारी दोन्ही टाळकी विकृतच म्हणावी लागतील, असं अमोल मिटकरी म्हणाले.
दरम्यान, खुल्ताबादमध्ये गेल्यानंतर सर्वजण औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतात असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावरुन कोणताही वाद निर्माण करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन सर्व दर्ग्यांचं दर्शन घेतल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं.