दि.8: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. नुकतेच राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या मेळाव्यानिमित्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या “मी पुन्हा येईन” या वक्तव्यावर शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना टोले लगावले.
यावेळी राज्याचा कारभार फार उत्तम पद्धतीनं चालला असल्याचंही शरद पवार म्हणाले. “संकट काळात राजकारण करायचं नसतं. काही लोकांना ते जमत नाही. ते कुठेही राजकारण करतात. निवडणूक लागायच्या आधीच, निकाल लागायच्या आधीच मी पुन्हा येईन असं सांगत फिरत होते. पण आम्ही येऊ देतो का?”, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांच्या जखमेवर मीठ चोळलं. तुम्ही पुन्हा येणार नाही याची पूर्ण खबरदारी आम्ही घेतलेली आहे. ही आघाडी आता यशस्वी झाली आहे आणि उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही, तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करत आहे, असं शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचे म्हटलंय. आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवारांची री ओढत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘शरद पवार डिवचत नसतात, ते कार्यक्रमच करतात मी म्हातारा होईपर्यंत देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होणार नाहीत. मी 63 वर्षांचा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत, म्हणजे ते झग झग म्हातारे होतील. त्यांची पाठराखण करणारे जे आहेत, तेही वार्धाक्यकडे झुकलेले दिसतील. म्हणजे पुढील 25 वर्षे तरी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहू नयेत. शरद पवार यांचा नादच करू नये, असे मिटकरी यांनी म्हटले.
यावेळी मिटकरींनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनाही टोला लगावला. तसेच, पडळकरांना जास्त गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असेही ते म्हणाले.