मुंबई,दि.९: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय आणि गंभीर वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्यावर थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पिंकी माळींच्या कुटुंबाला धमकावल्याचा दावा
आज (९ मार्च २०२६) अमोल मिटकरी यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी यांच्या आईची रुग्णालयात भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मिटकरी यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला.
आमदार मिटकरी म्हणाले, “पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांना पत्रकारांशी न बोलण्यासाठी धमकावण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबाने मला एक ऑडिओ क्लिप ऐकवली असून, या प्रकरणातील सत्य दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.”
नार्को टेस्टची आक्रमक मागणी
‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी अलीकडेच सीआयडीसमोर आपला जबाब नोंदवला आहे. या जबाबातात त्यांनी अपघाताचे सर्व खापर पायलट सुमित कपूर यांच्यावर फोडले होते. मात्र, मिटकरी यांनी हा दावा फेटाळून लावत सिंग यांच्यावरच निशाणा साधला आहे. “व्ही. के. सिंग यांचे अंडरवर्ल्डशी लागेबांधे असण्याची शक्यता असून, सत्य बाहेर येण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी,” अशी आक्रमक मागणी मिटकरी यांनी केली आहे.
जय पवार घेणार भेट
या प्रकरणाचे गांभीर्य वाढत असतानाच, अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार हे देखील लवकरच पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांची भेट घेणार असल्याचे मिटकरी यांनी सांगितले.
सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच थेट ‘अंडरवर्ल्ड’चा उल्लेख केल्यामुळे आता या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








