Imtiaz Jaleel: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली मुस्लिम संघटनेवर कारवाई करण्याची मागणी

0

दि.11: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मुस्लिम संघटनेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलनाच्या आडून सुरू असलेल्या राजकीय खेळीला त्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी पैगंबरावर केलेल्या वक्तव्याविरोधात आज महाराष्ट्रातील सोलापूर, औरंगाबाद, जालनासह दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. शुक्रवारच्या नमाजानंतर हे आंदोलन सुरू झाले.

शुक्रवारच्या नमाजा नंतर भारतातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक, दिल्लीच्या जामा मशिदीबाहेर निदर्शक जमले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांमुळे लोकांनी दुकाने बंद केली. त्याचवेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

महाराष्ट्रातही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रातील संवेदनशील अशा सोलापूर, औरंगाबाद, परभणी, जालन्यात हजारोंच्यां संख्येने मुस्लिम लोक रस्त्यावर आले. 

सोलापूरमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेसाठी एमआयएम पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तर, औरंगाबादमध्येही शेकडोंच्या संख्येने जमाव विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.

दरम्यान, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आंदोलन करणाऱ्या मुस्लीम संघटनेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलनाच्या आडून सुरू असलेल्या राजकीय खेळीला त्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी म्हटलं की, “ज्या कुणी या आंदोलनाचं आयोजन केलं होतं, त्यांना या गोष्टीची समज असायला हवी होती की, आंदोलनस्थळी किमान माईकची व्यवस्था असायला हवी. माईकची व्यवस्था का नव्हती? या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली होती का? याची चौकशी व्हायला हवी,” असंही जलील यावेळी म्हणाले.

त्यांनी पुढे म्हटलं की, “एवढ्या मोठ्या जमावाला नियंत्रित करायचं असेल तर तिथे माईकची व्यवस्था असायला हवी. ज्याद्वारे आपण लोकांशी संवाद साधू, पण तिथे माईकची व्यवस्था नव्हती. ह्या आंदोलनाचं आयोजन करणाऱ्या संघटनेकडून काही हलगर्जीपणा झाला असेल, तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी. कारण कोणत्याही स्थितीत शहरातील स्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नाही. ज्या मुद्द्यावर मुस्लीम समुदाय एकत्र आला आहे, त्याच्या आडून जर कुणी शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी,” अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here