वीजचोरीपोटी सांगोल्यात दोघांना 22 लाखांचा दंड
सोलापूर,दि. 29: सांगोला तालुक्यातील दोन दूध शीतकरण केंद्रांना वीजमीटरशी छेडछाड करणे चांगलेच महागात पडले आहे. या दोन शीतकरण केंद्रांनी वीजमीटर मध्ये किट बसवून रिमोटद्वारे तब्बल 58 हजार युनीटची वीजचोरी केली होती. परंतु महावितरणच्या पथकाने ही स्मार्ट वीजचोरी उघडकीस आणून या दोन वीजचोरांना तब्बल 22 लाख 22 हजारांचा दंड ठोठावला असून, वीजचोरांमध्ये खळबळ उडाली आहे. चालू आर्थिक वर्षांत 3665 वीजचोऱ्या उघडकीस आणण्याचे काम बारामती परिमंडलात झाले आहे.
प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे व मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या नेतृत्वाखाली बारामती परिमंडलात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम कठोरपणे राबविण्यात येत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या 7 महिन्यांत तब्बल संशयित वीजमीटर व परिसराची तपासणी करण्यात आली. तर वीज चोऱ्या उघडकीस आण्ण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोहीम राबवून आकडे बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. 3290 ठिकाणी वीजचोरी आढळून आली तर 375 ठिकाणी विजेचा गैरवापर सापडला. तब्बल 33 लाख 4 हजार 836 युनीटची वीजचोरी उघडकीस आणण्याचे काम परिमंडलातील वीज कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यांना 4 कोटी 46 लाखांचा दंड लावला आहे.
या व्यतिरिक्त सांगोला शहरातील एका व ग्रामीण भागातील एक अशा दोन दूध शीतकरण केंद्रांमध्ये मोठी वीजचोरी आढळून आली. दूध शीतकरण केंद्रांनी जुलै महिन्यात मीटरचे सील काढून त्यामध्ये फेरफार केले होते. रिडींगच्या माध्यमातून महावितरणला प्राप्त झालेल्या वीजमीटरच्या ‘एमआरआय’ माहितीचे जुलैपासून बारकाईने विश्लेषण करुन ग्राहकाच्या मीटरची तपासणी करण्यात आली. यात मोठी वीजचोरी आढळून आली. त्यामुळे सांगोला तालुक्यातील सर्वच शीतकरण केंद्रांची तपासणी केली. सांगोला शहरातल्या शीतकरण केंद्राने 35316 युनीटची केली होती. वीजचोरीची तीच पद्धत ग्रामीण भागातील एका शीतकरण केंद्रातही आढळून आली. या दोन्ही ग्राहकांना वीजचोरीचे व तडजोड आकाराचे मिळून 22 लाख 22 हजारांची बील आकारण्यात आले आहे. यातील काही रक्कम वसूल झाली असून उर्वरित रक्कम नोव्हेंबर महिन्यात भरण्याची लेखी हमी संबंधित ग्राहकाने दिली आहे.
सांगोल्यातील वीजचोरी पकडण्यासाठी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे व कार्यकारी अभियंता संजय गवळी यांचे मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता आनंद पवार, सहा. अभियंता सुजाता पवार, सांगोला शहर शाखा अभियंता अमित शिंदे, शिकाऊ अभियंता सूरज दिवसे, जनमित्र शंतनू इंगोले व उच्चस्तर लिपीक गणेश जाधव यांनी मेहनत घेतली.
वीजचोरांची गय नाही – पावडे
वीजचोर कितीही हुशार असला तरी महावितरणची यंत्रणा त्याचा छडा लावतेच. त्यामुळे ग्राहकांनी वीजचोरी करुन नये, तो दंडनीय व दखलपात्र गुन्हा आहे. बारामती परिमंडलात वीजचोरी विरोधी मोहीम सुरु असून, वीजचोरांची गय केली जाणार नाही.
सुनील पावडे,
मुख्य अभियंता, बारामती परिमंडल