दि.27: मेघालयमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बर्नार्ड एन मारक यांच्यावर कथितपणे सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे. बर्नार्ड एन मारक यांना अटक करण्यात आली आहे. बर्नार्ड एन मारक यांना उत्तर प्रदेशातील हापूर येथून अटक करण्यात आली आहे. आता मेघालयातून एक पोलीस पथक येत आहे, ते बर्नार्ड यांना आपल्यासोबत घेऊन जाईल.
त्यांच्या फार्म हाऊसवर छापा टाकल्यानंतर बर्नार्ड फरार झाल्याचे सांगण्यात आले. वेस्ट गारो हिल्स जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विवेकानंद सिंह यांनी सांगितले की, बर्नार्डला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. आता एक टीम तिथे जाईल आणि बर्नार्डला घेऊन येईल. त्याचवेळी हापूरचे एसपी दीपक भुकर यांनीही बर्नार्डला मेघालय पोलिसांच्या टीमकडे सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले.
हापूरच्या आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पिलखुवा पोलिस आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओपी) टीमने बर्नार्डला गाझियाबाद सीमेजवळील टोल प्लाझा येथून पकडले. मेघालय पोलिसांनी बर्नार्डच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केल्याचे त्या टीमला माहीत होते. बर्नार्डविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले आहे. या छाप्यात सुमारे 400 दारूच्या बाटल्या आणि 500 हून अधिक कंडोम जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते. या छाप्यात 27 वाहने, 8 दुचाकी आणि क्रॉसबो आणि बाणही जप्त करण्यात आले आहेत.
वेस्ट गारो हिल्स जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) विवेकानंद सिंग यांनी तेव्हा सांगितले होते की, एका गुप्त माहितीच्या आधारे राजकारणी बनलेल्या मारक यांच्या मालकीच्या रिम्पू बागान या फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला. यावेळी आम्ही चार मुले आणि दोन मुलींसह सहा अल्पवयीन मुलांची सुटका केली. मेघालय भाजपचे उपाध्यक्ष बर्नार्ड एन मारक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रिंपू बागानमधील केबिनसारख्या खोलीत ही मुले वेश्याव्यवसायासाठी बंद करून ठेवल्याचा आरोप आहे.
त्या फार्म हाऊसमध्ये एकूण 30 लहान खोल्या असल्याचे आढळून आले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते की, हे तेच ठिकाण आहे जिथे एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. विवेकानंद सिंग म्हणाले की, एका आठवड्यात अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे आणि कलम 366 अ, 376 आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.