मुंबई,दि.1: शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी लागणारी युती झाली आहे. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच या युतीची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीला संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असलेल्या मराठा सेवा संघानेही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
संभाजी ब्रिगेडची (Sambhaji Brigade) मातृसंस्था असलेल्या मराठा सेवा संघात (Maratha Seva Sangh) मोठे फेरबदल करण्यात येणार आहे. आज मराठा सेवा संघाचा 32 वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीनंतर मराठा सेवा संघात बदलाचे वारे वाहत आहेत. यानुसार मराठा सेवा संघात तरुणांना मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात येणार आहे.
नव्या फेरबदलानुसार, मराठा सेवा संघाची जबाबदारी 35 वर्षांच्या आतील मराठा समाजाच्या सरकारी कर्मचाऱ्यांकडे देण्याचा विचार सुरु आहे. या पुनर्रचनेसाठी मराठा सेवा संघाचे राज्यभर बैठका सत्र सुरु करण्यात येत आहे.
शिवसेनेला सत्तेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. याचपार्श्वभूमीवर मराठा सेवा संघात मोठे फेरबदल करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. मराठा सेवा संघाने पुर्नगठन करुन राज्यात आता जी नवीन युती झालीय, ती समवैचारिक संघटनेची युती आहे. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची राज्यात सत्ता येण्यासाठी पूरक वातावरण मराठा सेवा संघ करेल. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे संस्थापक अर्जुन तनपुरे यांनी सांगितले.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी देखील भाष्य केलं आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात झालेल्या युतीचे मी स्वागत करतो. ही युती लवकरच राज्यात वेगळं वळण देईल. सर्व निवडणूका एकत्र लढणार. किमान समान कार्यक्रम राबवून आगामी काळात आमचे नेते वाटाघाटी करतील, असं पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं आहे.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत प्रादेशिक आणि इतर विरोधी पक्षांना संपवण्याची भाषा सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी आणि शिवप्रेमातून शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती झाल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. शिवसेना आाणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येऊन पुढची वाटचाल करावी. महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घ्यावेत. शेतकरी, आदिवासी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी एकत्र काम करावे, अशी इच्छा संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.