जालना,दि.16: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मागणी करत उपोषण सुरू केले आहे. 10 फेब्रुवारीपासून जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. राज्य सरकारने 20 फेब्रुवारीला एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावे असे आवाहन केले आहे.
उपोषण सुरूच राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 20 फेब्रुवारीपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 20 तारखेनंतर पुढचे पुढे ठरवू, तोपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा असे मनोज जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षणासंदर्भात सकारात्मक असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. भाजपा नेते मंत्री नारायण राणे यांना जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे.
स्वतंत्र मराठा आरक्षणाचा वेगळा प्रवर्ग 50 टक्क्यांच्या बाहेर होणार आहे. हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन आरक्षणाला स्थगिती मिळाल्यास मराठा समाजाचे वाटोळे होईल, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
गावातील एखाद्या नदीला बारमाही पाणी असेल आणि शेतकऱ्यांना जाण्यासाठी वाट नसेल तेव्हा पर्यायी मार्ग काढावा लागतो. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाच्या आधारे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळेल. तर कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांनाही आरक्षण मिळतच आहे. तसेच ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना सगेसोयरे या निकषाचा वापर करत कुणबी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाजाचा तिहेरी लाभ होणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.