जालना,दि.28: मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. सर्व स्तरातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे.
फक्त त्यांनाच मोफत शिक्षण का? सर्वांचे शिक्षण मोफत द्या. फक्त एकाच समाजाला मोफत शिक्षण कशासाठी? असा प्रश्न भुजबळ यांनी विचारला. तर लवकरच न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
आंदोलन सुरूच राहणार
मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमधून 4 महत्वाच्या घोषणा केल्या. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. मराठा आरक्षणाच्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर महादिवाळी साजरी करणार असल्याचे ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्य सरकारला केले. 29 जानेवारी रोजी मनोज जरांगे रायगडावर जाणार आहेत तसेच परवा रायगडावर दर्शन घेणार आहेत. आंदोलन सुरु ठेवण्याच्या निर्णयावर जरांगे ठाम आहेत.
अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर होणार आहे. कायदा करण्यासाठी अधिसूचना गरजेची आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. विरोधकांना हरकती घेऊ द्या आपण सकारात्मक बाजू सांगावी. विरोध करणाऱ्यांना शांततेत उत्तर द्या. मराठ्यांसाठी कायदा फायदेशीर हे सोशल मीडियावरही सांगा, असा संदेश जरांगे यांनी मराठा समाजाला दिला आहे.
मला माझा समाज महत्त्वाचा आहे कुठलाही नेता महत्त्वाचा नाहीय. काही लोक मराठा समाजाचे आंदोलन मुद्दाम चिघळण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलन संपले नाही तात्पुरते स्थगित केले आहे, असेही जरांगे यांनी मराठा समाजाच्या लोकांसमोर स्पष्ट केले आहे. तसेच आंदोलन सुरु ठेवायचे की नाही असेही जरांगे यांनी उपस्थितांना विचारले, तेव्हा तेथील लोकांनी आंदोलन सुरुच ठेवायचे, असे सांगितले. समाजाच्या भल्यासाठी रक्त सांडलेय. आता शेपूट राहिलेय, असेही जरांगे म्हणाले.
मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेणार नाही असे फडणवीस म्हणाले. याला जरांगे पाटलांनी उत्तर दिले. मग आंदोलन सुरुच राहणार, असे जरांगे म्हणाले. आता लाख मराठाऐवजी लाख ओबीसी, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी दिली होती. यावर उत्तर देताना दोन्ही आम्हीच असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांसह ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा खरपूर समाचार घेतला. ‘वाया गेलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका’ असा सल्लाही त्यांनी आंतरवाली गावातील जमलेल्या समर्थकांना दिला.