सोलापूर,दि.19: मराठा आरक्षण आंदोलन शमविण्यासाठी झालेल्या आर्थिक देवाणघेवाणची ऑडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल होत असून या क्लिपमधील व्यक्तींची चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन-तीन दिवसापासून समाज माध्यमांमध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून त्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलन शमविण्यासाठी मागील सरकार मधील नेत्यांनी मराठा क्रांती मोर्चातील काही स्वयंघोषित समन्वयकांना प्रचंड पैसा दिल्याचे दिसून येत आहे. सदरील ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित व्यक्तींच्या नावाचा उल्लेख आहे. आंदोलन काळात जवळपास 42 मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये वायरल झाल्यानंतर मराठा समाजातील तरुणांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून त्यांच्यामध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना तयार झाली आहे. तसेच मराठा समाजात यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख असणाऱ्या व्यक्तींना जाब विचारला असता त्यांच्याकडून समाज माध्यमावर दमदाटी आणि चितावणीखोर भाषा वापरली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
या प्रकारामुळे मराठा समाजातून कुठल्याही प्रकारची चुकीचे पाऊल उचलले जाऊ नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संबंधित ऑडिओ क्लिप आणि त्यात उल्लेख झालेल्या व्यक्ती यांच्यात झालेली प्रचंड मोठी आर्थिक देवाण घेवाण याची कसून कायदेशीर चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी आढळून आले असते त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.
निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष गजानन शिंदे संघटक रमेश चव्हाण दत्ता जाधव सोमनाथ भोसले ज्ञानेश्वर पवार संजय भोसले शाहरुख पटेल सचिन चौगुले इत्यादी उपस्थित होते.