जालना,दि.14: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणामुळे प्रकृती खालवल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी उपचारास नकार दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.गेल्या पाच दिवसांपासून जरांगे यांनी पाणी आणि औषधोपचार घेतलेले नाहीत. त्यामुळे त्यांची तब्बेत खालावली आहे.
दरम्यान आज मराठा समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोशल मीडियावरून महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. त्यामुळे या बंदला राज्यातील अनेक भागात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान समाजाने शांततेत आंदोलन करावं असं आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
जरांगे पाटील यांची तब्येत चिंताजनक होताच, त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरूवात झाली आहे. काल रात्री जालना-जळगाव रोडवर टायर जाळण्यात आले. आज हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. लातूर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज बंद पुकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. तर मालेगावमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत.