मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाबाबत मोठा निर्णय

0

जालना,दि.23: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. राज्य सरकारने 20 फेब्रुवारीला एक दिवसीय विशेष अधिवेशन घेत मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने मंजुरी दिली आहे. मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने फसवणुक केली म्हणत आंदोलन सुरू केले आहे.

24 फेब्रुवारीपासून रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं होते. सध्या बारावीच्या परिक्षा सुरू आहेत. आंदोलन सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत करण्याचे ठरले होते. यामुळे विद्यार्थांना अडचणीचे ठरले असते. अनेकांनी मनोज जरांगे यांना रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती.

विद्यार्थांची होणारी अडचण लक्षात घेता मनोज जरांगे यांनी रास्ता रोको आंदोलनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा आंदोलकांनी अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं आहे. “आपण थोडासा यात बदल केला तर चांगलं राहील. मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं, एखाद्या लेकीबाळीचा पेपर राहायला नको. याची खबरदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. 24 तारखेचा रस्ता रोको आहे त्यामध्ये 11 ते 1 असा बदल करावा. या बदलामुळे कुणाला पेपरला जायचं असेल तर अडचण येणार नाही. हा बदल आपण आवश्य करावा”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.

“अर्ध्या तासाने काही फरक पडत नाही. मराठा समाजाने हा बदल करणं अपेक्षित आहे. आपल्याला न्याय घ्यायचा असेल तर इतर समाजावर अन्याय होता कामा नये. माझ्याकडे पाच ते सात समाजाचे पत्र येऊन पडले आहेत. या समाजाने आपल्याला साथ दिली आहे. राज्यसभरात येत्या 24 तारखेला 11 ते 1 यावेळेत रास्ता रोको आंदोलन करु. त्यानंतर 25 तारखेपासून रास्ता रोको आंदोलनाचं रुपांतर काही दिवसांसाठी धरणे आंदोलनात करु. त्यामुळे परीक्षा आणि इतर कामांना अडचणी येणार नाहीत. हे माझं वैयक्तिक मत आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here