जालना,दि.29: मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे यांनी शिवराळ भाषेत टीका केली होती. यानंतर अनेक भाजपा आमदारांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना माफी नाही असे वक्तव्य केले होते.
भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनीही विधान परिषदेत मनोज जरांगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. जर केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकते, तर जरांगे पाटील यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे जरांगे पाटील यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कारवाईच्या पार्श्वभूमीर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. ‘मला अटक करू द्या, ज्या जेलमध्ये असेन, ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील. मी शेतकऱ्याचं पोरगं, ग्रामीण भागात राहिलोय. भाषा माझी तशीच आहे. फडणवीस आणि माझं शत्रुत्व नाही. मी कुणाला घाबरत नाही. जेलला टाका नाहीतर कुठेही टाका..माघारी परतल्यावर पुन्हा आरक्षणासाठी लढेन.’ असे मनोज जरांगे म्हणाले.
मी दोषी नाही. मी समाजासाठी लढतोय. उभं आयुष्य पणाला लावलंय. ५७ लाख नोंदींच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना आरक्षण मिळालं असेल. उर्वरित मराठा समाजासाठी आरक्षण मागतोय. कुठलीही यंत्रणा वापरा, काहीही झालं तरी मी हटत नाही. सत्ता असल्याने ते कधीही अटक करू शकतात. असे जरांगे पाटील म्हणाले.