मुंबई,दि.8: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आमदार आणि मंत्र्यांना इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केले होते. या महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन त्यात मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे जाहिर केले आहे.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी समाजातून विरोध होत आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसीतून देण्यात येऊ नये असे म्हणत ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. अनेक जिल्ह्यात ओबीसी एकत्र येत सभा घेत आहेत.
जे कुणी आमदार, मंत्री मराठा सगेसोयरे आरक्षणासाठीच्या कायद्याला पाठिंबा देणार नाहीत, त्यांची गाठ माझ्याशी आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय… मराठा नेते दिवंगत शशिकांत पवार यांच्या मुंबईत झालेल्या स्मृतीसभेत ते बोलत होते. एकदा आरक्षण मिळू दे, भुजबळांमध्ये किती दम आहे तेच बघतो, असा दमही जरांगेंनी यावेळी दिला.
15 फेब्रुवारीला अधिवेशन होऊन गेलं तर परत विशेष अधिवेशन बोलावलं जाणार नाही, त्यामुळे 10 फेब्रुवारीपासून उपोषण करण्यावर ठाम असल्याचं मनोज जरांगे-पाटलांनी सांगितलंय..10 तारखेपासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणापाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा बांधवानी उभं राहावं असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.