बुलढाणा,दि.4: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत, ज्यांच्या नोंदी त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी महाजनांवर निशाणा सधला आहे. गिरीश महाजनांनी चुकीचे वक्तव्ये करू नयेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याने भरकटल्यासारखी वक्तव्ये करू नये. विनाकारण मराठ्यांना नडू नका, अन्यथा त्यांच्या आश्वासनाच्या क्लिप राज्यभर व्हायरल करू, असा थेट इशारा जरांगेंनी महाजनांना दिला आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील आणि खानदेशातील मराठे एकत्र येत नाही असे म्हटले जायचे पण सभेची गर्दी पाहून तुमच्या लक्षात येईल. गिरीश महाजनांनी विचार करावा आणि नंतर वक्तव्ये करावीत. त्यांनी आपल्या मागणी पूर्ण करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर त्यांना आपण वेळ दिला होता. आमच्याकडे त्यांनी दिलेल्या आश्वासनाचे अनेक पुरावे आहेत. चुकीची वक्तव्ये करून समाजाची दिशाभूल करू नका. अन्यथा आम्ही त्यांच्या आश्वासनाच्या क्लिप राज्यभर व्हायरल करु.
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा जड जाईल
17 डिसेंबरला आम्ही बैठक घेणार आहे. राज्यभरातून सर्व मराठा अंतरवाली सराटे येथे येणार आहे. सरकारला अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा अशी विनंती करणार आहे. मराठा आंदोलक बांधवांवरील अजूनही गुन्हे मागे घेतले नाहीत. सरकरने सांगितलं होतं की गुन्हे दाखल करणार नाही तरी देखील गुन्हे दाखल करून लोकांना अटक करण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालवेत. हे थांबवा नाहीतर तुम्हाला जड जाईल असा इशारा सरकारला दिला आहे.
6 डिसेंबरपासून राज्याचे अधिवेशन होणार आहे. सर्व मराठा आमदारांना आवाहन आहे की तुम्ही सरकावर दबाव टाका. अधिवेशनात तुम्ही काय करतात याकडे आमचे लक्ष असणार आहे. विरोधी आणि सरकारमधील मराठा आमदारांनी आरक्षणासाठी एकत्र यावं आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असे जरांगे म्हणाले.