जालना,दि.२०: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. मराठा आरक्षणाच्या मागण्यांची सरकारने पूर्तता न केल्याने मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होणार आहेत. २० जानेवारीला मुंबईत आंदोलनाकरिता जाणार असल्याचे अगोदरच मनोज जरांगे यांनी जाहीर केले होते. आंदोलक आज अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे जाण्यासाठी निघणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला निघण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. आता प्राण गेले तरी माघार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मराठ्यांच्या अंगावर आरक्षणाचा गुलाल लागणारच आहे. अंतरवलीतून मी जरी एकटा निघत असलो तरी मुंबईमध्ये तीन कोटी लोक येणार आहेत. असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत सरकारला दिलेली मुदत आज संपली आहे. मुंबईकडे निघतांनाच आंतरवाली सराटीमधूनच आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं मनोज जरांगे म्हणाले आहे. त्यामुळे सरकारची मोठी अडचण वाढू शकते.
ज्या मराठ्यांनी त्यांना गादीवर बसवलं…
मनोज जरांगे पाटील बोलताना भावूक झाले. मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘राज्यात ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. करोडोच्या संख्येने लोक एकत्र येत आहेत, २५०-३०० आत्महत्या झाल्या आहेत. तरीही सरकार निर्णय घेत नाही. एवढं निर्दयी सरकार असू शकत, ज्या मराठ्यांनी त्यांना गादीवर बसवलं, त्यांना हक्काचं आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे आता यांचा राजकीय सुपडासाफ केल्याशिवाय राहायचं नाही. एवढा निर्दयीपणा आमदार, खासदारामध्ये असू शकतो. मी समाजात असेल नसेल, मराठ्यांनी एकजूट तुटू देऊ नका’ असे म्हणत जरांगे भावूक झाले.