मनोज जरांगे पाटील यांनी चूक मान्य करत मागितली माफी

0

जालना,दि.२१: मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. बारसकरांच्या आरोपांवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटलांनी माघार घेत संत तुकाराम महाराज यांची माफी मागितली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “माझ्या तोंडून चुकीचे शब्द गेले असतील तर मी तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांची माफी मागतो. माझ्या आयुष्यातील ही पहिली माफी आहे. मात्र मी तुकाराम महाराजांना मानतो. मी वापरलेले ते शब्द मागे घेतो,” अशा शब्दांत जरांगे पाटलांनी आपली चूक मान्य केली.

पहिला समोर आला, अजून 20 बारस्कर बाहेर येतील असा पलटवार जरांगे यांनी केला आहे. मुंबई मोर्चावेळी शेवटच्या दोन गुप्त बैठकांमध्ये काय झालं हे मनोज जरांगेंनी स्पष्ट करावं असं सांगत जरांगेंचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही जरांगे हेकेखोर असून ते दररोज पलटी मारतात असा आरोप बारसकरांनी केलाय. 

मनोज जरांगे पाटील यांनी अजय महाराज बारस्कर यांच्यासह राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “अजय महाराज बारस्कर हा सरकारचा ट्रॅप आहे. तुकाराम महाराजांच्या आडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाकीच्या आरोपांना मी महत्त्व देत नाही. उपोषणाच्या काळात माझी चिडचिड होते. त्या चिडचिडीतून माझे काही शब्द गेले असतील, त्यावर माझी सपशेल माघार आहे. कारण मी वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे. मात्र सरकारने तुकाराम महाराजांच्या आडून ट्रॅप टाकू नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here