Manoj Jarange: ‘राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठा समाजाचे…’ मनोज जरांगे पाटील 

0

पुणे,दि.२०: Manoj Jarange On Raj And Uddhav Thackeray: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठा समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही, उलट लोकांना आनंदच होईल. ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

Manoj Jarange On Raj And Uddhav Thackeray

“मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजेत” ही जुनी म्हण आम्ही लहानपणापासून ऐकल्याचे सांगत लोकांची तीव्र इच्छा आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी भावनिक हाक मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली आहे. दरम्यान, येत्या २९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईत काढण्यात येणारा मोर्चा हा मागील मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल आणि या लढ्यात कोणत्याही अडथळ्याशिवाय विजय मिळवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाज आणि मराठा समाज कधीच वेगळे नव्हते आणि नसणार असे  सांगितले. धनगर समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून, जर मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत असतील तर त्याला विरोध का करायचा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओबीसी बांधवही गरीब मराठ्यांच्या लेकरांचे कल्याण व्हावे असेच इच्छितात, असे जरांगे पाटील यांनी नमूद केले. मराठा आणि कुणबी एकच असून, ५८ लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे आह. त्यामुळे आता कुणबी प्रमाणपत्रांच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येता कामा नये, असे ते म्हणाले.

मुंबई मोर्चाचे स्वरूप आणि मार्ग

२९ ऑगस्ट रोजी निघणारा मुंबई मोर्चा अंतरवलीतून निघेल आणि पैठण, शेवगाव, अहिल्यानगरमार्गे शिवनेरी जुन्नरला पहिला मुक्काम करेल. त्यानंतर माळशेज घाटातून कल्याण, चेंबूरमार्गे आझाद मैदान गाठेल. हा मोर्चा कोणालाही लक्ष्य करण्यासाठी नसून, केवळ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आहे. जरांगे पाटील यांनी मीडियासमोर कधीही खोटे बोललो नसल्याचे सांगत या मोर्चात प्रचंड गर्दी असेल असा विश्वास व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आरोग्याच्या स्थितीबद्दलही भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे शरीर त्यांना जास्त दिवस साथ देत नाही आणि ते “थोडे दिवसांचे पाहुणे” आहेत. मात्र, मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असून, जाताना राजा शिवछत्रपतींच्या पवित्र शिवनेरी गडाचे दर्शन घेऊन, कपाळाला तिथली माती लावून जातील. त्यांचा उद्देश केवळ गरिबांचा लढा जिंकणे असून, राजकारणात उतरण्याचा किंवा निवडणूक लढवण्याचा त्यांचा सध्या कोणताही हेतू नाही. ते कोणत्याही पक्षाला अडथळा न येण्याची विनंती करत, मराठा समाजातील सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांना पक्षापेक्षा समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here