जालना,दि.28: मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी या मूळगावी गावात दगडफेक झाली आहे. यावेळी दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. डीजेवरून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. या दगडफेकीच्या घटनेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. या दगडफेकीच्या घटनेवरून मनोज जरांगे यांनी गंभीर आरोप केला आहे. मातोरी गावात 27 जून रोजी दगडफेक झाली.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मातोरी गावात दगडफेक प्रकरणात छगन भुजबळ यांचाच हात असावा, त्यांनीच त्यांच्या लोकांना दगडफेक करायला सांगितले असावे. भुजबळ यांना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केला. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांवर बारीक लक्ष ठेवावे, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.
गावात गुरुवारी रात्री जो प्रकार घडला, तो शंभर टक्के छगन भुजबळ यांनीच करायला लावला, अशी मला शंका येते. वडीगोद्री येथेच आंदोलन का करायला लावलं? एल्गार सभा सुद्धा अंबड मधूनच सुरू केली होती. प्रति सभा घेतली मग जातीयवादी नाहीतर काय? असे प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी करून दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यांचे मनसुबे पुर्ण होऊ देणार नाही. त्यांना हल्ला घडायला माझेच गाव का सापडले ? छगन भुजबळला मुद्दाम वाटेत जायची सवय आहे. आंदोलन करायला विरोध नाही; पण आमच्या आंतरवालीच्या समोरच कोणत्या हेतूने ठेवले होते, असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
यानंतर लक्ष्मण हाके यांनी भाष्य करताना खोचक शब्दांत टीका केली. आम्ही लोकशाहीतील संविधानातील लढाई लढतो आहोत. आम्ही कुणाला घाबरत नाही, असे लक्ष्मण हाके म्हणाले. यावेळी पत्रकारांनी मातेरी गावातील दगडफेक आणि मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेले आरोप, याबाबत लक्ष्मण हाके यांना प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना, मनोज जरांगे यांना छगन भुजबळ नावाची कावीळ झाली आहे. त्यामुळे त्यांना कुठेही छगन भुजबळ यांचे चित्र दिसते. या पुढच्या कालावधीत चांगल्या डॉक्टरकडे जाऊन इलाज घेतला पाहिजे. कावीळ अशीच वाढत गेली की काय होते, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राला माहिती आहे. डॉक्टरांकडून चांगला सल्ला घ्यावा. चांगली ट्रीटमेंट घ्यावी, अशी त्यांना विनंती आहे, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.