अक्कलकोट,दि.१६: श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे देशातील एक प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून उदयास येत आहे. याचे कारण असे की श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री गुरु दत्तात्रयांचे चौथे अवतार आहेत व त्यांचे मूळस्थान अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आहे, याचे भान ठेवून मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्यासह सर्व विश्वस्त पदाधिकारी अत्यंत विनम्रपणे भाविकांना सेवा देत आहेत, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. त्यांनी नुकतेच अक्कलकोट येथे येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
स्वामी दर्शनापासून धार्मिक उपक्रम भाविकांना लागणारी कोणतीही तात्काळ मदत, गर्दीमध्ये वयोवृद्ध व विकलांग स्वामी भक्तांना तात्काळ स्वामी दर्शनाची सोय इत्यादी बाबी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीचे व्यवस्थापन संदर्भात असलेले वेगळेपण सिद्ध करीत आहेत. त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व्यवस्थापन हे उत्कृष्ट पद्धतीचे असल्याचे मनोगत मुंबई येथील मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.
त्यांनी सहकुटुंब येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी बाळा नांदगावकर व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रथमेश इंगळे, मनसे नेते दिलीप धोत्रे, अक्कलकोट मनसेचे मल्लिनाथ पाटील, मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, महेश पाटील, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, दत्ता हालसंगी आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.