Mallikarjun Kharge On Lok Sabha: इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांचे सूचक विधान

0

नवी दिल्ली,दि.6: Mallikarjun Kharge On Lok Sabha: इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी सूचक विधान केलं आहे. दिल्लीत बुधवारी लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर मल्लिकार्जून खरगेंनी सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार का यासंदर्भातील प्रश्नावर थेट उत्तर दिलेलं नाही.

नरेंद्र मोदी काहीही आव आणोत पण देशातील जनतेने मोदींच्या विरोधात स्पष्ट कौल दिला असून संविधानावर दृढ विश्वास असलेल्या सर्वांचेच आम्ही इंडिया आघाडीत स्वागत करत आहोत, अशी साद या बैठकीतून घालत नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये ही जनतेची इच्छा आहे आणि जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी योग्य पावले टाकण्याची रणनीती इंडिया आघाडीने एकमुखाने आखली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. जवळपास दोन तास ही बैठक चालली. बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, कल्पना सोरेन, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, आपचे संजय सिंह, राघव चड्ढा, तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यासह 19 पक्षांचे 33 नेते उपस्थित होते.

मल्लिकार्जुन खरगे यांची सूचक विधान | Mallikarjun Kharge On Lok Sabha

बैठकीत सर्व घटकपक्षांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर खरगेंनी इंडिया आघाडी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वखालील भारतीय जनता पार्टीविरोधातील संघर्ष करत राहील असं म्हटलं आहे. देशातील जनतेला भाजपाचं सरकार नकोय. त्यामुळेच इंडिया आघाडीकडून जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी योग्य पावलं उचलली जातील, असं सूचक विधान खरगेंनी केलं.

देशातील जनता या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या पाठीशी उभी राहिली. त्याबद्दल आम्ही जनतेचे आभार मानत आहोत. या जनादेशाने भाजपच्या द्वेष आणि भ्रष्ट राजकारणाला चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी तसेच महागाई, बेरोजगारी, भांडवलशाहीच्या विरोधात हा जनादेश आहे, असे नमूद करतानाच जनतेला जी आश्वासने आम्ही दिली आहेत ती आम्ही निश्चितपणे पाळू, असा विश्वास खरगे यांनी इंडिया आघाडीच्या वतीने देशातील जनतेला दिला. इंडिया आघाडी ही निवडणूक एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने लढली आहे असे नमूद करत आघाडीतील सर्व पक्षांचे खरगे यांनी अभिनंदन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here