नवी दिल्ली,दि.19: मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) काँग्रेस अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. शशी थरुर यांचा पराभव झाला आहे. देशातील सर्वांत जुन्या काँग्रेस पक्षाला तब्बल 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे शशी थरुर यांचा एकतर्फी पराभव करत काँग्रेसचे ‘सरसेनापती’ झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 9 हजार 800 जणांनी मतदान केले होते. खर्गे यांना 7 हजार 897 मते पडली. विरोधी शशीर थरुर यांना 1072 हजार मते मिळाली. थरूर यांनी पराभवाचा स्वीकार करत खर्गे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेसचे नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा जन्म कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वरवट्टी भागात एका शेतकरी कुटुंबात झाला. गुलबर्गा येथील नूतन विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर येथील शासकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. येथे ते विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीसही होते. गुलबर्ग्याच्या सेठ शंकरलाल लाहोटी लॉ कॉलेजमधून एलएलबी केल्यानंतर त्यांनी कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली. 1969 मध्ये ते MKS मील्स एम्प्लॉईज युनियनचे कायदेशीर सल्लागार बनले. त्यानंतर त्यांनी कामगारांसाठी लढा दिला. ते युनायटेड ट्रेड युनियनचे प्रभावी नेते होते.
1969 मध्येच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची लोकप्रियता पाहून पक्षाने त्यांना गुलबर्गा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केले. 1972 मध्ये ते पहिल्यांदा कर्नाटकातील गुरुमितकल विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. खर्गे गुरुमितकल मतदारसंघातून नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले. या कालखंडात त्यांनी विविध खात्यांचे मंत्रीपदही भूषवले. 2005 मध्ये त्यांना कर्नाटक प्रदेश काँग्रेसची जबाबदारी मिळाली होती. 2008 पर्यंत ते या पदावर होते. 2009 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.
खर्गे हे गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू मानले जातात. 2014 मध्ये खर्गे लोकसभेत विरोधी पक्षनेते झाले. 2019 लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने त्यांना 2020 मध्ये राज्यसभेवर पाठवले. गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला तेव्हा खर्गे यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली.