नवी दिल्ली,दि.8: मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. लक्षद्वीपमध्ये पर्यटनाच्या मुद्द्यावरून भारत आणि मालदीवमध्ये झालेल्या संघर्षानंतर आता मालदीवने आपल्या मंत्र्यांवर कारवाई केली आहे. उल्लेखनीय आहे की, पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही देशातील लोकांमध्ये वाद पाहायला मिळत होते. मालदीवचे मंत्री अब्दुल्ला महझूम मजीद यांनी X वर पोस्ट केल्यानंतर हा संघर्ष वाढला. मात्र, आता मालदीव सरकारने एक निवेदन जारी करून याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
तीन मंत्र्यांना केले निलंबित
मालदीव सरकारने मंत्र्याने केलेली टिप्पणी ही त्यांची वैयक्तिक टिप्पणी असल्याचे म्हटले आहे. या प्रकारची भाषा सरकारची नाही. परदेशी नेत्यांच्या विरोधात केलेल्या टिप्पण्या या मंत्र्यांच्याच टिप्पण्या आहेत. मालदीवच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालदीव सरकारने तीन मंत्र्यांवरही कारवाई केली आहे. तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आले आहे.
भारतीयांनी ‘बायकॉट मालदीव’हा ट्रेंड सुरू केला असून त्यात सेलिब्रिटींनीही उडी घेतली. यानंतर आता EaseMyTrip या ट्रॅव्हल कंपनीने या घटनेचा निषेध व्यक्त केला असून, मालदीवला जाणाऱ्या विमानांचे बुकिंग रद्द केले आहे. कंपनीचे सीईओ निशांत पिट्टी यांनी एक्सवर यासंदर्भातील घोषणा केली आहे.
EaseMyTrip या कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांनी मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांनंतर मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाला समर्थन म्हणून EaseMyTrip ने मालदीवच्या सर्व विमानसेवांचे बुकिंग रद्द केले आहे, असे निशांत पिट्टी यांनी सांगितले आहे.
काय आहे वाद?
वास्तविक, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या लक्षद्वीप भेटीचा अनुभव X वर शेअर केला होता. ज्यामध्ये पंतप्रधानांनी लिहिले होते, “ज्यांना रोमांचकारी अनुभव घ्यायचा आहे, लक्षद्वीप त्यांच्या यादीत नक्कीच असावे.” मी स्नॉर्कलिंगचाही प्रयत्न केला. किती उत्साहवर्धक अनुभव होता तो!” पंतप्रधान मोदींची ही पोस्ट व्हायरल झाली आणि अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लक्षद्वीपला मालदीवचे पर्यायी पर्यटन स्थळ म्हटले. त्यानंतर मालदीव सरकारच्या नेत्यांकडून आक्षेपार्ह कमेंट येत आहेत.
भारतात जोरदार विरोध
मालदीवच्या मंत्र्यांच्या वक्तव्याला भारतात जोरदार विरोध झाला होता. अनेक सिनेतारक आणि क्रिकेटपटूंनी ट्विट करून या वक्तव्याचा निषेध केला आहे. चित्रपट स्टार अक्षय कुमारने X वर लिहिले आहे की मालदीवच्या प्रमुख व्यक्तींकडून भारतीयांविरोधात द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. ज्या देशाने त्यांना सर्वाधिक पर्यटक पाठवले त्या देशासाठी ते हे करत आहेत हे आश्चर्यकारक आहे. आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगले आहोत पण असा अनावश्यक द्वेष का सहन करावा? मी अनेक वेळा मालदीवला भेट दिली आहे आणि नेहमीच त्याचे कौतुक केले आहे, परंतु सन्मान प्रथम येतो. चला भारतीय बेटांचा शोध घेऊ आणि आपल्या देशाच्या पर्यटनाला चालना देऊ या.