Big News: ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई

0

मुंबई,दि.५: Big News: sanjay raut breaking news: ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) रडारवर असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्ध अखेर प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली आहे. ईडीने संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबागमधील मालमत्तात जप्त केल्या आहेत. यामध्ये दादरमधील एक सदनिका आणि अलिबागमधील ८ भूखंडांचा समावेश आहे. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाले होते. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील ईडीची थेट कारवाई हा शिवसेनेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडी राऊतांवर कारवाई करणार, असे इशारे भाजप नेत्यांकडून दिले जात होते. मात्र, आता ईडीने प्रत्यक्षात संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने अशाचप्रकारे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीवर टाच आणली होती. तर दुसरीकडे यशवंत जाधव आणि राहुल कनाल या शिवसेना नेत्यांच्या घरावर आयकर खात्याने छापे टाकले होते. मात्र, आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा फेरा थेट संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणांचे पुढचे लक्ष्य मातोश्री असणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here