माजी महापौर महेश कोठे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार

0

सोलापूर,दि.१३: माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) आज बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असुन त्यासाठी काल दुपारीच ते मुंबईला रवाना झाले.

आषाढी एकादशीला शासकीय महापुजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पंढरपुरला आले होते त्यावेळी महेश कोठे यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर असलेले महेश कोठे एकनाथ शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरु आहे. कोठे यांनी या बातमीचा इन्कार करत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना देण्यासाठी महेश कोठे (Mahesh Kothe) काल मुंबईला रवाना झाले. आज ते शरद पवारांची भेट घेतील. ही भेट ‘रुटीन’मधली असल्याचे प्रथमेश कोठे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पुर्वीपासून चांगले संबंध आहेत. त्यांनी अनेकदा मदत केली आहे. मुख्यमंत्री झाल्यावर ते प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही सर्वजण पंढरपुरला गेलो होतो, असेही कोठे यांनी स्पष्ट केले.

महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे २१ नगरसेवक निवडुन आणले होते. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली, परंतु त्यांना अपयश आले. या निवडणुकीत त्यांनी चांगली मते मिळवली होती. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले. ऐनवेळी दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून कोठे शिवसेनेवर नाराज आहेत.

शिवसेनेचे तत्कालीन संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनीच आपले तिकीट कापले असा आरोप कोठे यांनी केला होता. सध्या सावंत हेच शिंदेसेनेच्या बांधणीत आघाडीवर आहेत. ही पार्श्वभूमी असताना महेश कोठे शिंदेसेनेत जातील असे वाटत नसल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. मात्र अमोल शिंदे, मनोज शेजवाल हे त्यांचेच समर्थक असलेल्या दोघा माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

दरम्यान कोठे यांच्या गटातील काही माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत जाण्यासाठी आग्रह धरला असुन काहींचा ओढा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. यामुळे महेश कोठे संभ्रमात असल्याचेही बोलले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here