मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार; महेश कोठे यांनी दिले स्पष्टीकरण

0

सोलापूर,दि.11: माजी महापौर महेश कोठे हे एकनाथ शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले माजी महापौर महेश कोठे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरात भेट घेतली. त्यामुळे महेश कोठे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली. मात्र याबाबत महेश कोठे यांनी आपण शिंदे गटात सामील झालेलो नाही. मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्या सत्कार करण्यासाठी गेलो होतो. ते एकेकाळी माझ्या पक्षाचे सहकारी होते, असे सांगत आपण राष्ट्रवादीतच जाणार असल्याचे कोठेयांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोठे यांनी भेट घेतल्यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले होते. कोठे हे शिंदे गटात सामील झाल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या. त्यामुळे कोठे यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या लोकांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती. अखेर याबाबत कोठे यांनीच खुलासा केला. ते म्हणाले की, आपण शिवसेनेत असताना शिंदे यांनी आम्हाला चांगले सहकार्य केले होते. स्टँडिंग कमिटी चेअरमन निवडतानाही त्यांनी स्टे आणून मदत केली होती. तेच आज मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचे स्वागत करणे माझे कर्तव्य आहे. मी शिंदे गटात सामील झालेलो नाही. मी राष्ट्रवादीतच जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here