महाराष्ट्रात लोकांची पसंती कुणाला? महायुती की महाविकास आघाडी?

0

मुंबई,दि.२५: पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. या निवडणुकांपूर्वी जनतेला आकर्षित करण्यासाठी रणनीती आखण्यासाठी भाजप आणि विरोधी इंडिया आघाडी बैठका घेत आहेत. दरम्यान, सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अशातच महायुतीचं काळजी वाढवणारा धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. यानुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुसंडी मारेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के अधिक मते मिळतील, असंही सर्व्हेत सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी व्होटर्सनं सर्व्हे केला आहे. त्यात २ लाखांहून अधिक नागरिकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. या सर्व्हेतील आकडे महाविकास आघाडीसाठी दिलासादायक तर भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाची काळजी वाढवणारे आहेत.

२०१९ साली शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर येत महाविकास आघाडीच्या नावाखाली सरकार स्थापन केलं. पण, २०२२ मध्ये शिवसेना आणि २०२३ जून मध्ये राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गटाला बरोबर घेतल्यानं भाजपाची ताकद वाढल्याचं बोललं जातं. पण, सर्वेतून वेगळीच आकडेवारी समोर आली आहे.

सर्व्हेनुसार लोकसभेला महाविकास आघाडीला…

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आहे. तर, महायुतीत शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपा आहे. सर्व्हेनुसार लोकसभेला महाविकास आघाडीला २६ ते २८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, महायुतीला १९ ते २१ जागा मिळतील. अन्य पक्षांना २ जागा मिळतील, असं सर्वेत सांगण्यात आलं आहे.

कुणाला किती मते?

मतांच्या टक्केवारीतही महाविकास आघाडी वरचढ दिसत आहे. महाविकास आघाडीला ४१ टक्के मते मिळू शकतात. तर, महायुतीला ३७ आणि बाकी पक्षांना २२ टक्के मते मिळतील, असं अंदाज सर्वेत म्हटलं गेलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here