Uday Samant | १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात: उदय सामंत यांचं मोठं विधान

0

मुंबई,दि.२४: Uday Samant On Uddhav Thackeray: शिवसेना (शिंदे गट) नेते मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं विधान केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ही सुनावणी सुरू असून शिवसेनेचा व्हीप मोडल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हे आमदार अपात्र ठरले, तर राज्याच्या राजकारणात काय घडणार? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

मध्यावधी निवडणुकांची शक्यता: उद्धव ठाकरे

दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंनी राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता बोलून दाखवली आहे. “कसब्यात काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावंच लागेल. पण माझा अंदाज आहे की विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागेल किंवा लागू शकेल. कारण अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ते आमदार जर अपात्र ठरले तर आपल्या राज्यात मध्यावधी लागू शकतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उदय सामंत यांची प्रतिक्रिया | Uday Samant On Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची काहीही शक्यता नाही. आमच्याकडे १७० आमदारांचं बहुमत आहे. शिवाय १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं विधान उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

१५ ते २० आमदार आमच्या संपर्कात | Uday Samant

एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले, “लोकशाहीमध्ये आणि मंत्रीमंडळ स्थापन करताना बहुमत महत्त्वाचं असतं. १७० आमदार आमच्याबरोबर आहेत, हे वारंवार आम्ही सांगितलं आहे. अजून १५ ते २० लोक आमच्या संपर्कात आहेत. येत्या एक-दोन दिवसात आपल्याला याची प्रचिती येईल. त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागण्याची काहीही शक्यता नाही. आपले कार्यकर्ते सैरभैर होऊ नये. निवडणूक आयोगाच्या निकालामुळे आपल्या कार्यकर्त्यांना नैराश्य येऊ नये, म्हणून उद्धव ठाकरेंनी ते विधान केलं आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here