पुणे,दि.21: Maharashtra: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांत पुण्यासह राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा वाढला होता. काल पुण्यात बऱ्याच दिवसांनी किमान तापमानाचा पारा 20 अंशाच्या पार गेला होता. उन्हाचे चटके सहन केल्यानंतर आज पुण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. आज पुण्यातील एनडीए परिसरात किमान तापमान 10 अंशाच्या खाली गेलं आहे. तर उर्वरित ठिकाणी देखील पारा 2 ते 3 अंश सेल्सिअसने घसरला आहे. पण येत्या काळात पुन्हा उन्हाचे चटके वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवली आहे.
आज पुण्यातील एनडीए याठिकाणी सर्वात कमी किमान नोंदलं असून येथील पारा 9.8 अंशावर पोहोचला होता. तर शिरूर 10.3, हवेली 10.9, पाषाण 11 आणि माळीण येथील 11 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदलं आहे. उर्वरित पुणे जिल्ह्यातील किमान तापमान 11 ते 18.8 च्या दरम्यान नोंदलं गेलं आहे. यासोबतच आज सातारा 14.7, महाबळेश्वर 15.4, जळगाव 11.4, नाशिक 11.3, माळेगाव 14, बारामती 12.9, मुंबई 17.1, जेऊर 14, औरंगाबाद 15.5, अहमदनगर 10.5, उस्मानाबाद 17 आणि नागपूर याठिकाणी 12.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदलं आहे.
राज्यात तापमानाचा पारा घसरला असला तरी पुढील पाच दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात हवामान खात्याकडून कोणताही इशारा दिला नाही. काही ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानाची शक्यता आहे. पण कुठेही पावसाचा इशारा देण्यात आला नाही.