शरद पवार आणि अजित पवार एकत्र आहेत का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

0

पुणे,दि.१४: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन फूट पडली असली, तरी उद्योजक प्रतापराव पवार यांच्या घरी पवार कुटुंब एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे तेथे शरद पवारांबरोबरच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले. यामुळे बाहेर पवार काका-पुतणे दोघेही एकमेकांचे विरोधक असले, तरी ते आतून एकत्र आहेत, असे तर्कवितर्क लावले जात आहेत. यावर आता स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनीच भूमिका स्पष्ट केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “वैचारिक प्रगल्भता फार महत्त्वाची आहे. मी राजकारण समाजकारण करते ते शरद पवार व यशवंतराव चव्हाण यांच्या संस्काराने करते. यशवंतराव चव्हाणांचे संस्कार शरद पवारांवर झाले. तेच संस्कार माझ्यावर झाले. आपण मराठी माणसं फार सुसंस्कृत असतो. आपली लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाही.”

…आणि प्रेमाची नाती वेगळी

“आमच्यासाठी तरी ही लोकशाही आहे. वैचारिक लढाई आणि प्रेमाची नाती, मैत्री, वेगळी. प्रमोद महाजन भाजपात होते, मात्र शरद पवारांचे आजही महाजन कुटुंबाशी ऋणानुबंध आहेत. प्रमोद महाजन नसले, तरी पुनम महाजन यांच्याबद्दल आजही माझ्या मनात प्रेमच आहे आणि ते कायम राहील. मुंडे कुटुंब आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबाबद्दलही तेच आहे”, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

“आजही दिल्लीत आमच्या घरात काही कार्यक्रम असेल, तर अटलबिहारी वाजपेयी यांची मानस कन्या आणि कुटुंब आजही येतं. अरुण जेटली, सुषमा स्वराज यांचेही कुटुंब येते. आमची लढाई वैचारिक होती, वैयक्तिक नव्हती,” असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here