Sanjay Shirsat On Ajit Pawar: ‘अजित पवार, प्रफूल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शाह यांच्याबरोबर…’ संजय शिरसाट

0

मुंबई,दि.१६: Sanjay Shirsat On Ajit Pawar: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अलीकडेच ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी बैठक झाली होती.

या बैठकीत शरद पवारांनी मोठा खुलासा केला आहे. भाजपाबरोबर जाण्यासाठी कुटुंबाला लक्ष्य केलं जात आहे. कुणाला व्यक्तिगत निर्णय घ्यायचा असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण, पक्ष म्हणून आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही, असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचा दावा संजय राऊतांनी सामनाच्या ‘रोखठोक’ सदरात केला आहे.

संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनीही भाष्य केलं आहे. “राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील, याला शरद पवारांची मुक संमती आहे,” असं संजय शिरसाटांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितलं आहे.

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम वाजवायचा होता | Sanjay Shirsat

“उद्धव ठाकरेंना बोलवून शरद पवारांनी इशारा दिला असावा, असं माझं मत आहे. दीड तासांची बैठक चहा, पाणी करून किंवा एक वाक्य बोलून होत नसते. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम वाजवायचा होता तो वाजवलेला आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहत नसून, त्यासाठी ते कुणाबरोबरही युती करण्यात तयार असतात. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांना राहायचं नाही. त्यांचा कल भाजपाकडे आहे. म्हणून ते भाजपाबरोबर जातील,” असं संजय शिरसाटांनी म्हटलं आहे.

अजित पवार, प्रफूल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शाह यांच्याबरोबर… | Sanjay Shirsat On Ajit Pawar

“राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील. कारण, याला शरद पवारांची मुक संमती आहे. अजित पवार, प्रफूल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शाहांबरोबर ८ एप्रिलला ठरवून बैठक केली. उद्या राष्ट्रवादी भाजपाबरोबर आल्यास नवल वाटण्यासारखं काहीच नाही,” असा दावाही शिरसाटांनी केला आहे.

आम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही…

अजित पवार भाजपाबरोबर गेल्यास शिवसेनेची भूमिका काय असणार? असा प्रश्न विचारल्यावर संजय शिरसाट म्हणाले, “अजित पवारांना त्यांची कातडी वाचवायची आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांचीही ईडी चौकशी सुरु आहे. मग, यांना भीती नाही का? फक्त तुम्हालाच भीती आहे का? हे सर्व खोटं आहे. मात्र, आम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही. भाजपाने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे,” असेही शिरसाटांनी स्पष्ट केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here