Raj Thackeray: राज ठाकरे यांनी फोटो शेअर करत शिंदे-फडणवीस यांचे मानले आभार

0

मुंबई,दि.२४: Raj Thackeray On Shinde-Fadnavis: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोटो शेअर करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात खळबळजनक माहिती सांगितली होती. माहीमजवळ समुद्रात अनधिकृत मजार उभारली जात असून दुसरा हाजी अली निर्माण करण्यात येत असल्याचा दावा करत राज यांनी व्हिडिओही दाखवला होता. तसेच, सांगलीच्या कुपवाड येथेही अनधिकृत बांधकाम होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणीही केली. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशीच प्रशासनाने तातडीने कारवाई केली. या कारवाईनंतर राज यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानत हिंदूंना आवाहनही केलं आहे. 

राज ठाकरे यांनी मानले आभार | Raj Thackeray On Shinde-Fadnavis

राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. जर ही मजार हटवली नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशाराही त्यांनी जाहीरपणे दिला. मात्र, राज्य सरकारने अवघ्या १२ तासांत भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कारवाईची मोहिम हाती घेतली. मुंबई प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला, त्याचसोबत जेसीबीने सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवण्यात आले. तर, सांगलीतील त्या वादग्रस्त जागेवरही कारवाई करण्यात आली. त्यानंतर, मनसैनिकांनी राज ठाकरेंचा इम्पॅक्ट म्हणत सोशल मीडियावर बॅनरबाजीही केली. आता, स्वत: राज ठाकरे यांनी फोटो शेअर करत झालेल्या कारवाईचं स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत. तसेच, मोठी पोस्टही लिहिली आहे. 

धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चेहेल, सांगली मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. राज यांनी या कारवाईवर पहिल्यांदाच भाष्य केलंय. 

आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमणच आहे, त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं! असं आवानही राज ठाकरेंनी केलीय. राज यांनी आपल्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात भाषण करतानाही दक्ष राहण्याचं सर्वांना सूचवलं होतं. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here