मुंबई,दि.11: महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने इशारा दिला आहे. राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होणारे बदल नवनवीन समस्य़ा निर्माण करताना दिसत आहेत. मुंबई, सोलापूर, पुण्यासह राज्याच्या इतर भागात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. राज्यात अनेक ठिकाणी थंडी वाढू लागली आहे.
अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे हलक्या आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, मुंबई शहराचे कमाल तापमान 31.0 अंश राहील, तर थंडीच्या काळात ते 24.0 अंशांपर्यंत घसरेल. आज शहराची हवेची गुणवत्ता AQI स्केलवर 153 आहे. सकाळी काही प्रमाणात धुके किंवा धुके पडण्याची शक्यता आहे, तर दुपारी अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.
राज्यात काही भागात शनिवारी हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, नाशिक, परभणी, बीड, अहिल्यानगर आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित भागात दिवसभर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.
नैऋत्य किनारपट्टी, आग्नेय समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तीन ठिकाणी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने IMD सांगितले की, आग्नेय अरबी समुद्रात केरळजवळ चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही भागात दाट धुके निर्माण झाले आहे. तसेच काही भागात थंडी वाढली आहे. काही भागात पाऊस आणि ढगाळ हवामान अनुभवण्यात येत आहे.