मुंबई,दि.18: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह दिले. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मशाल चिन्ह दिले आहे. मूळ पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे प्रमुख राज ठाकरे होणार असल्याची मध्यंतरी चर्चा होती.
राज ठाकरे हे शिवसेना (शिंदे गट) प्रमुख होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख झाले तर आश्चर्य वाटायला नको, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या विधानामुळे राज ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार का? अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. नाशिकमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपने रेस लावली आहे. ही लॉयल्टीची रेस आहे.
उद्धव ठाकरे यांना गरज पडली तर सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं मोदी म्हणाले आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे यांना प्रचाराला आणलं जात आहे. त्यांना प्रचाराला येण्यास मजबूर केलं जात आहे. दोन भावंडांमध्ये अधिक लॉयल्टी कुणाकडे आहे यामध्ये चुरस लावलेली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोघेही भाजपसोबत असतील अशी परिस्थिती दिसत आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.