Maharashtra Politics: ‘अजित पवार हे मनातून कुणाबरोबर आहेत हे येत्या…’ शिंदे गटाच्या आमदाराचे मोठे विधान

0

मुंबई,दि.१: Maharashtra Politics: अजित पवार हे मनातून कुणाबरोबर आहेत, हे येत्या दोन चार दिवसांत कळेल असे विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे ४० आमदारांसह भाजपाला पाठिंबा देतील, अशीही चर्चा सुरू होती. या चर्चांवर स्वत: अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जिवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार आहे, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी यापूर्वी दिलं आहे.

आमदार संजय शिरसाट यांचे मोठे विधान | Maharashtra Politics

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाबाबत मोठं विधान केलं आहे. येत्या दोन ते चार दिवसात महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडू शकतो, अशा आशयाचं विधान शिरसाट यांनी केलं आहे. अजित पवार हे मनातून कुणाबरोबर आहेत, हे येत्या दोन चार दिवसांत कळेल, असं विधान संजय शिरसाट यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

खरं तर, आज महाविकास आघाडीची मुंबईत ‘वज्रमूठ’ सभा पार पडणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “आज सगळ्यात जास्त त्रास हा अजित पवारांना होत असेल. माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत अजित पवारांची खुर्ची ‘वज्रमूठ’ सभेत ठेवायची की नाही, याबाबत महाविकास आघाडी संभ्रमात होती. त्यांनी यापूर्वी जी समिती निर्माण केली होती, त्यामध्ये कुठेही अजित पवारांचं नाव नव्हतं. अजित पवार मनातून कुठे आहेत? हे दोन चार दिवसांत कळेल.”

संजय शिरसाट यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राजकीय भूकंपाची तारीख जवळ आली का? याबाबतही तर्क वितर्क लावले जात आहेत. पण अजित पवारांनीच यापूर्वीच आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here