Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ धगधगली, ऋतुजा लटके पोटनिवडणुकीत विजयी

Maharashtra Politics News शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri By Election Result 2022) विजय मिळवला आहे.

0

मुंबई,दि.6: Maharashtra Politics News अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri By Election Result 2022) शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेऱ्यांपर्यंत लटके या आघडीवर होत्या. ऋतुजा लटके 53471 मतांनी विजयी झाल्या आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीच्या विजयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मधल्या कपट कारस्थानानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. आमचं पक्षचिन्ह गोठवलं याचं दुख आहे. मशाल चिन्ह मिळालं, मशाल भडकली आणि भगवा फडकला. या विजयाचं श्रेय शिवसैनिकांना आहेच, आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी बिग्रेड आणखी सुद्धा हितचिंतक आहे, त्यांना मी धन्यवाद देतो’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अंधेरी पोटनिवडणुकीच्या विजयावर पहिली प्रतिक्रिया दिली.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर लटके यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

आता लढाईची सुरुवात ही विजयाने झाली आहे. सगळे मिळून एकत्र लढलो आणि विजय झाला. यापुढेही सगळे एकत्र मिळून लढणार आहोत आणि विजय खेचून आणू, असा विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला.

भाजपाला नोटाची मते मिळाली असती

कदाचित आमचं चिन्ह गोठवलं, त्या निवडणुकीच्या निमित्ताने आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं होतं. ज्यांच्या मदतीने चिन्ह गोठवलं ती लोक आसपासही फिरकली नाही. मात्र, त्यांच्या कर्ते करवते त्यांनी पहिला अर्ज भरला. त्यानंतर त्यांना अंदाज आला आणि माघार घेतली. पण जर त्यांनी निवडणूक लढवली असती तर नोटाची मतं त्यांना मिळाली असती, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

नोटाचा वापर

या निवडणुकीमध्ये नोटाचा वापर झाला. मला त्यांच्याबद्दल आता काहीच बोलायचं नाही. त्यांच्याकडून आता काही अपेक्षा नाही. अधिकृत निवडणूक लढवली असती तर नोटाला जितकी मत मिळाली तितकी मत भाजपला मिळाली असती, असंही ठाकरे म्हणाले.

निवडणूक चिन्ह महत्त्वाचं आहे. शिवसेनाप्रमुख ज्या धनुष्यबाणाची पूजा करायचे ते अजूनही मातोश्रीवर त्यांच्या खोलीमधील देव्हाऱ्यामध्ये आहे. ते चिन्ह गोठवलं गेलं. चिन्ह कुठलं असलं तरी जनता ही आम्हाला मतदान करत असते, हे आता सिद्ध झालं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मध्यावधी निवडणूक का लागणार?

याच कारण असं की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ मोठ्या घोषणा करत असतो. कालपर्यंत गुजरातच्या निवडणूक जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रातील जमीनवर काही प्रकल्प ठरले होते. जे प्रकल्प येणार होते, प्रकल्प महाराष्ट्रातून ओरबाडून नेण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांना महाराष्ट्राचं प्रेम व्यक्त व्हायला लागलं आहे. 2 लाख कोटींचे प्रकल्प म्हणजे, जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रांकडे दिले आहे. या घोषणांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होऊ शकता, असा माझा अंदाज आहे, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं.

भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायचं की नाही हे बघतोय. मध्ये माझी एक सभा आहे. आमच्याकडून काही नेते नक्की जातील. आमचे ज्येष्ठ नेते नक्की जातील, कोण जाणार हे ठरवलं जाईल, असंही ठाकरेंनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here