मुंबई,दि.१६: Maharashtra Politics: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. १६ आमदारांच्या अपात्रेसह शिवसेना पक्षचा प्रतोद कोण? यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. निकालात न्यायालयाने शिंदे गटाने भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले. १६ अपात्रेसह शिवसेना पक्ष कुणाचा यावर विधानसभा अध्यक्षांनी वेळेत निकाल द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले.
व्हीप कुणाचा? | Maharashtra Politics
शिवसेनेत फूट पडली असतानाच अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शिवसेनेप्रमाणेच या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या व्हीपचाही प्रश्न निर्माण होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे व्हीप जितेंद्र आव्हाड आहेत तर दुसरीकडे अजित पवार गटाचे व्हीप म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल पाटील यांनी व्हीप बजावणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे व्हीप कुणाचा हा वाद आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर येणार आहे. (Maharashtra Politics)
आमदार सरोज अहिरे यांनी पाठिंबा दर्शविल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील आमदारांची संख्या ३६ पर्यंत पोहोचली आहे. शरद पवार यांच्याकडे १७ आमदार आहेत. अनिल पाटील यांनी आम्ही व्हीप बजावण्याची प्रक्रिया सुरू करत असून, अधिवेशन काळात उपस्थितीसाठी तसेच बैठकांसाठी हा व्हीप बजावणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या १२ आमदारांना शरद पवार गटाकडून नोटीसही पाठविण्यात आली आहे. अद्याप राष्ट्रवादीतील फुटीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य केलेले नाही. त्यामुळे अधिवेशनात दोन्ही गट आमने-सामने येणार असून, शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्याप्रमाणेच अनिल पाटील यांना व्हीप म्हणून मान्यता मिळणार की जितेंद्र आव्हाड यांचा व्हीप लागू होणार, याबाबत अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गट
भरत गोगावले यांची व्हीप म्हणून झालेली निवड सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला त्यांची नव्याने निवड करावी लागणार आहे.
त्यांची निवड झाल्यानंतरही त्यांचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होईल का, हा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे सचिव अनिल परब यांना केला असता, न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला त्यांचा व्हीप लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले.
शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांचेही व्हीप स्वतंत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.